उरण
उरण तालुक्यात एका दिवसात तब्बल तीन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असलेल्या या घटनांमुळे “उरणमध्ये नेमकं चाललंय तरी काय?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, सलग घडलेल्या या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  पहिली घटना न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नव्याने उभारण्यात येत असलेल्या जेडब्ल्यूआर कंपनीजवळ घडली. रस्त्यालगतच्या खारफुटीच्या झुडपांमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख मुरारी कुमार अशी पटली असून तो ऑफकॉन कंपनीत कार्यरत होता. प्राथमिक माहितीनुसार, दारूच्या नशेत तो खाडीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
 दुसरी घटना सारडे गावाजवळ घडली. प्रमोदिनी पाटील (वय ७०) या मनोरुग्ण महिला घरातून लग्नाला जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. अखेर डोंगर परिसरात रानभाज्या गोळा करण्यासाठी गेलेल्या आदिवासी दाम्पत्याला झाडाझुडपांमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
 तिसरी घटना उरण रेल्वे स्थानकाजवळ घडली. स्थानकालगतच्या खारफुटीच्या झुडपांमध्ये ३५ ते ४० वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
  तीन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, एका दिवसात सलग तीन मृतदेह सापडल्याने उरणकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, की त्या स्वतंत्र घटना आहेत, याचा तपास पोलीस करीत असून, सत्य परिस्थिती लवकरात लवकर समोर यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00