1
पिंपरी
‘बदलत्या काळात नोकरीची संधी कमी होत आहे. त्यामुळे हताश होऊन चालणार नाही. त्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. एआयच्या जगातही रोजगाराची संधी कशी मिळेल हा दृष्टीकोन ठेऊन काम केले जाईल. शिवसेनेच्या माध्यमातून तरुणांना करिअरबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. कोणते शिक्षण घेतले तर भविष्यात किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, याची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडताच तरुणांना नोकरी मिळेल’, असा विश्वास विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन अहिर यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवडगावातील चिंचवडे लॉन्स येथे हा मेळावा पार पडला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे, शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, शहरप्रमुख, नगरसेवक निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, निलेश बारणे, महानगरप्रमुख राजेश फलले, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे, जिल्हा समनव्यक बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख खंडूशेठ चिंचवडे, महिला जिल्हा संघटिका शैला भोंडवे,युवती युवती संघटिका सायली साळवे, महिला संघटिका सरिता साने उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले, ‘तरुण, तरुणांसाठी संधीचे दार उघडण्याचे हे व्यासपीठ आहे. कोणतीही नोकरी छोटी असली तरी ती स्वीकारून पुढे गेले पाहिजे. कंपन्यांसाठी ही संधीचे दार उघडण्यात येत आहे. कौशल्य असलेले तरुण कंपन्यांना मिळणार आहेत. नोकरीची संधी ज्याला मिळणार नाही, त्याला जॉबकार्ड दिले जाणार आहे. त्यातून आशेचा किरण मिळत आहे. यातून कोणाला हताश होण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जातील. उद्योग टिकला पाहिजे. उद्योग टिकला तर कामगार आणि कामगार टिकला तर संघटना टिकतील. उद्योगांना प्राधान्य देणे काळाची गरज आहे’.
‘किमान सहा महिन्याला एक नोकरी महोत्सव होणे काळाची गरज आहे. यातून तरुणांना मार्गदर्शन करून त्यांच्या हाताला रोजगार देणे आवश्यक आहे. तरुणांनी दिशाहीन होऊन चालणार नाही. तरूणांना रोजगाराच्या माध्यमातून दिशा मिळाली पाहिजे. नोकरी मिळालेल्या प्रत्येकाने आणखी एकाला नोकरी मिळवून द्यावी. केंद्र, राज्य सरकार अनेक उद्योग आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरे, जिल्हे, प्रभागापर्यंत असे मेळावे होणे गरजेचे आहे. त्यासाठी एक अप तयार केले पाहिजे. नगरसेवक विश्वजीत बारणे तरुणांना दिशा देण्याचे काम करीत आहेत. घराजवळच नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुटुंब मजबूत झाले, तर समाज मजबूत होईल आणि समाज मजबूत झाला तर देश मजबूत होईल’, असेही अहिर म्हणाले. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तिला ऑफर लेटर देण्यात आले. विश्वजीत बारणे यांनी प्रास्तावीकात तरुणांना मार्गदर्शन केले. सुलभा उबाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
श्रीरंग बारणे सर्वात वजनदार खासदार
खासदार श्रीरंग बारणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी गेल्यावेळीच आली असती. परंतु, अजूनही सर्वजण आशावादी आहोत. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना ओळखून आहेत. दिल्लीत सर्वात वजनदार खासदार श्रीरंग बारणे आहेत. हे आम्ही जवळून पाहिले आहे. कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा वजनदार आहेत. पण, मंत्रीपद मिळाले पाहिजे. बारणे यांनी विश्वासर्हता कमविली आहे, असेही उपसभापती अहिर म्हणाले.
तरुणांना सहजतेने नोकरी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर शेतकरी, कामगार, तरुण-तरुणींना अनेक योजनेच्या माध्यमातून जोडण्यात आले. लखपतीदिदीच्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यात आली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत केली जात आहे. केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून विविध चांगली कामे सुरू आहेत. तरुणांना सहजतेने नोकरी उपलब्ध व्हावी. या हेतूने भव्य नोकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात दोन हजारहून अधिक तरुणांना थेट नोकरी मिळणार आहे, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.
दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे १२५ कंपनीतील प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी यांसह विविध उद्योग क्षेत्रांतील कंपनी व उद्योग प्रतिनिधी तसेच ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, ह्युंदाई, डॉ. रेड्डी फाउंडेशन, बीव्हीजी इंडिया अशा नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अवघ्या पाचवी पास झालेल्या उमेदवारापासून ते आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्यांनुसार योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यात करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’चे वाटप करण्यात आले आहे.
Please follow and like us:
