Home पुणे पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींनी राज्यपालांना बांधली राखी

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींनी राज्यपालांना बांधली राखी

लोकभवन, मुंबई येथे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी सोहळा

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

माईंच्या लेकींशी राज्यपालांचा आपुलकीचा संवाद

सासवड

रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा अनोखा स्नेहबंध जपला.

अनाथ मुली, दिव्यांग भगिनी, महिला स्वच्छता कर्मचारी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला भगिनींनी लोकभवन, मुंबई येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. या वेळी राज्यपालांनी सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. “रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाच्या धाग्याने एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरांवर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला व मुलींसोबत यंदाचे रक्षाबंधन साजरे करण्याचा मला विशेष आनंद झाला,” अशी भावना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केली. ममता बाल सदनच्या मुलींशी संवाद साधताना राज्यपालांनी केवळ औपचारिकता न राखता अत्यंत आपुलकीने प्रत्येक मुलीचे पूर्ण नाव, ती कोणत्या वर्गात किंवा अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, तिची आवड आणि भविष्यातील ध्येय याबाबत विचारपूस केली. राज्यपालांनी दाखविलेल्या या आपुलकीमुळे माईंच्या लेकींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. “तुम्ही सर्व मुली मन लावून, गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या आणि भविष्यात मोठ्या पदावर जाऊन देशाची व समाजाची सेवा करा,” असा प्रेमळ सल्ला देत राज्यपालांनी सर्व मुलींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी माईंच्या लेकींनी लोकभवनातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी तसेच संपूर्ण कर्मचारीवृंदालाही राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. त्यामुळे लोकभवनातील वातावरण काही काळासाठी एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे स्नेह, माया आणि आपुलकीने भारावून गेले. माईंच्या लेकींनी तयार केलेला विदर्भाचा प्रसिद्ध गोरसपाक संस्थेचे अध्यक्ष दिपक दादांनी त्यांना भेट दिला.

या प्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, खाजगी सचिव अर्चना गायकवाड, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, एडीसी नवदीप अग्रवाल, माईंच्या लेकी कु. मीनल सिंधुताई सपकाळ, कु. साक्षी सिंधुताई सपकाळ, कु. आकांक्षा भगत, कु. पावनी सिंधुताई सपकाळ, कु. श्रावणी कामठे, तसेच पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन (बालगृह) संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, अधीक्षिका स्मिता अरविंद पानसरे, माई बेकर्सच्या सौ. सुजाता गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, गोपाल देशी गोशाळेचे व्यवस्थापक प्रसन्न गायकवाड, नाना कुंभारकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यपालांना भावले माईंच्या लेकीचे स्केच!

ममता बाल सदन (बालगृह) येथील विद्यार्थिनी कु. आकांक्षा भगत हिने आपल्या कलागुणांना साकारत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे सुंदर स्केच तयार केले होते. रक्षाबंधनानिमित्त हे स्केच फोटोफ्रेम करून तिने राज्यपालांना प्रेमपूर्वक भेट दिले. आपले स्केच पाहून राज्यपालांनी आकांक्षाचे मनापासून कौतुक केले. “बेटा, आपने बहुत सुंदर स्केच बनाया है. आपका बहुत-बहुत धन्यवाद. एक दिन आप बहुत बड़े आर्टिस्ट बनोगे,” अशा प्रेमळ शब्दांत त्यांनी आकांक्षाच्या कलागुणांना दाद देत तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी केलेले हे कौतुक आकांक्षासाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरले आहे. “मी मनापासून तयार केलेले स्केच राज्यपालांना आवडले आणि त्यांनी माझ्या कलेचे कौतुक केले, ही माझ्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी बाब आहे,” अशी भावना आकांक्षाने व्यक्त केली.  सध्या कु. आकांक्षा भगत ही पुणे येथील अभिनव आर्ट कॉलेजमध्ये कमर्शिअल आर्टचे शिक्षण घेत असून, भविष्यात एक मोठी आणि नामांकित कलाकार होण्याचे तिचे स्वप्न आहे. राज्यपालांच्या शुभेच्छांमुळे तिच्या या स्वप्नाला जणू नव्या उंच भरारीची प्रेरणाच मिळाली आहे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00