Home पुणे गणना अर्जांच्या डिजिटायझेशनमध्ये राजकीय पक्षांनी सक्रिय भूमिका घ्यावी -जिल्हाधिकारी

गणना अर्जांच्या डिजिटायझेशनमध्ये राजकीय पक्षांनी सक्रिय भूमिका घ्यावी -जिल्हाधिकारी

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमात प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असून याद्या अचूक व परिपूर्ण तयार करण्यासाठी राजकीय पक्षांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. विशेषतः गणना अर्जांच्या डिजिटायझेशनचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रभावी योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे तसेच विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख, सचिव आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास दोन सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण १२ हजार ६३१ सहाय्यक कार्यरत आहेत. आतापर्यंत ५५ टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले असून ५३ टक्के गणना अर्जांचे वितरण करण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले, या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्जांचे डिजिटायझेशन जास्तीत जास्त मतदारांचे अर्ज वेळेत डिजिटाईज होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी आठवड्यातून किमान एक दिवस बीएलओकडील याद्यांची पडताळणी करावी. पात्र मतदाराचे नाव कोणत्याही परिस्थितीत यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. ज्या मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचणार नाही किंवा अर्ज जमा होणार नाही, त्यांचे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणे आणि ते डिजिटायझेशनसाठी उपलब्ध करून देण्यात राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

शहरी भागात डिजिटायझेशनचे काम अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी यापुढे राजकीय पक्षांची साप्ताहिक बैठक दर बुधवारीऐवजी दर सोमवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येईल, अशी माहिती दिली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात डिजिटायझेशनच्या कामासाठी ४५० विद्यार्थी मदत करणार असल्याचे सांगितले. इतर मतदारसंघांतील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00