Home पुणे बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जबिलच्या रांजणगाव येथील अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन; इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. तसेच जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल  कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील, ज्ञानेश्वर कटके, राज्याचे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, जॅबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. त्यामुळे डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

 इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये महाराष्ट्राने अग्रस्थान मिळविल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे उद्योग क्षेत्राला नवी गती मिळणार आहे.

यावेळी त्यांनी जेएनपीटी आणि उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडल्याची माहिती दिली. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाणार असून त्यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी होईल. यामुळे महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीतील प्रभावी केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा सुमारे १४ टक्के वाटा असून निर्यातीत हा वाटा २० टक्क्यांपर्यंत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जबिलच्या या अत्याधुनिक प्रकल्पात दिसणारी अचूकता, प्रगत तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवकल्पना भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत. भारत आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीमध्ये मोठी झेप घेत असून मोबाईल उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यानंतर आता सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रातही देशाने भक्कम पाऊल टाकले आहे, असेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

राज्यातील उद्योगांना शासन भागीदार म्हणून पाहत असून व्यवसाय सुलभतेसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रांजणगाव परिसरात महावितरण (एमएसईडीसीएल) चे स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करण्यबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेली कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत या औद्योगिक पट्ट्यात पोलिस यंत्रणा अधिक बळकट करण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जबिलच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या जमीन सुधारणांमुळे आणि महाराष्ट्र शासनाच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे उद्योगांना मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग १३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून इलेक्ट्रॉनिक्स ही भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जगातील अग्रगण्य राष्ट्र बनविण्यासाठी गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उच्च-अचूकता उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करताना त्यांनी देशात चार सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प सुरू असून मुंबई–पुणे बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत, तर पुणे–हैदराबाद प्रवास सुमारे २ तास ८ मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगून देशात मोठे औद्योगिक आणि पायाभूत परिवर्तन घडत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 गेल्या एका वर्षात जबिल कंपनीचे भारतातील एकूण उत्पादन क्षेत्रफळ ५ लाख चौरस फुटांवरून १२ लाख चौरस फुटांपर्यंत वाढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारांवरून जवळपास ११ हजारांपर्यंत पोहोचली आहे असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला म्हणाले.

जबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.  हा नवीन प्रकल्प कुशल मनुष्यबळ आणि अभियांत्रिकी क्षमता एकत्र आणून उच्च दर्जाची उत्पादने अधिक वेगाने तयार करण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00