Home पिंपरी चिंचवड अंशिकाच्या उपचारासाठी पत्रकार महासंघाची मदतीची सुरुवात; प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांचे अधिकाधिक मदतीचे आवाहन

अंशिकाच्या उपचारासाठी पत्रकार महासंघाची मदतीची सुरुवात; प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांचे अधिकाधिक मदतीचे आवाहन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी 
 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या अंशिका मिश्रा हिच्या उपचारासाठी संयुक्त महाराष्ट्र मराठी पत्रकार महासंघाने सामाजिक संवेदनशीलतेतून मदतीचा हात पुढे केला आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी अंशिकाच्या कुटुंबीयांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देत तिच्या उपचारासाठी मदतीची सुरुवात केली. तसेच अंशिकाला उपचारासाठी अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
चिखली परिसरातील म्हेत्रेवाडी येथे राहणाऱ्या अंशिकावर मागील आठवड्यात सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, तिच्या शरीरावर जवळपास ९० टाके पडले आहेत. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या या हल्ल्याने तिच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
अंशिकाचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून, तिचे वडील हे कुटुंबातील एकमेव कमावते असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलीच्या गंभीर दुखापतीनंतर तिच्या उपचारासाठी मोठा खर्च उभा राहिला आहे. मुलीला वाचविण्यासाठी आणि उपचार सुरू ठेवण्यासाठी पालकांची अक्षरशः धावपळ सुरू आहे.
या घटनेचे वृत्तांकन करत असताना पत्रकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी अंशिका आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केवळ घटनेचे वृत्तांकन करून न थांबता पत्रकार संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पुढे यावे, या भावनेतून वाकडे यांनी उपचारासाठी ६ हजार रुपयांची मदत सुपूर्द केली.
“अंशिकासाठी केलेली ही मदत केवळ सुरुवात आहे. अवघ्या पाच वर्षांच्या या चिमुकलीला पुन्हा निरोगी आयुष्य मिळावे, यासाठी तिचे उपचार पूर्ण होणे गरजेचे आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि संवेदनशील नागरिकांनी पुढे येऊन अंशिकाच्या उपचारासाठी शक्य ती अधिकाधिक मदत करावी,” असे आवाहन प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी केले.
दरम्यान
पत्रकार संघटनेने केवळ घटनेचे वृत्तांकन न करता पीडित कुटुंबाच्या वेदनेत सहभागी होत मदतीची प्रत्यक्ष सुरुवात केल्याने, पत्रकारितेतील सामाजिक संवेदनशीलतेचा वेगळा आदर्श या निमित्ताने समोर आला आहे.
यावेळी संघटनेच्या प्रदेश समन्वयक अश्विनी सातव-डोके, कायदेशीर सल्लागार ॲड. गणेश गायकवाड, प्रकाशिका मोहिनी कारंडे आणि सदस्य मनोज बोरगे उपस्थित होते.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00